लक्ष द्यायचे म्हणजे नक्की काय

काही शाळांमध्ये प्रार्थना झाल्या नंतर दोन तीन मिनिटे शांत बसवतात।किंवा एखाद्या व्यक्तीला श्रद्धांजली अर्पण करण्यात येते त्यावेळी आपण दोन मिनिटे शांत उभे राहतो।असे उभे राहाता त्यावेळी तुम्ही काय करता?  त्यावेळी काय करायचे हे कधीच सांगितलेले नसते,त्यामुळे तो वेळ संपता संपत नाही,

        माइंडफुलनेसच्या सरावाची सुरुवात करण्यासाठी अशी दोन मिनिटे पुरेशी आहेत।आपले मन माकड आहे,सतत या विचारावरून त्या विचारावर उड्या मारत असते,त्यामुळे आपल्या मेंदूत एकाच वेळी अनेक फाईल्स ओपन असतात.तुम्हाला माहित आहेच कि कॉम्प्युटर किंवा स्मार्टफोनमध्ये एकाच वेळी अनेक फाईल्स ओपन असतील तर तो स्लो होतो,काहीवेळा हँग होतो. त्यातील काही फाईल्स बंद कराव्या लागतात. माणसाचा मेंदू हा सुपर कॉम्प्युटर आहे,पण त्याचे काम चांगले व्हायचे असेल तर त्याच्यातील देखील काही फाईल्स काहीवेळ बंद करायला शिकायला हवे.ते एक कौशल्य आहे आणि नियमित सरावाने ते वाढते. ही दोन मिनिटे आपल्या मेंदूतील काही फाईल्स बंद करायला वापरायची.आपण पहात असतो,ऐकत असतो आणि त्याचवेळी मनात विचार येत असतात।आता डोळे बंद करायचे आणि आपले सर्व लक्ष बाह्य आवाजावर केंद्रित करायचे,चारी दिशांनी येणारे विभिन्न आवाज ऐकायचे.असे करतो त्यावेळी डोळे बंद केल्याने आपण बाह्य दृश्याची फाईल बंद करतो.मनातील विचारांच्या फाईल्स मात्र चालूच असतात त्यामुळे मध्येच मनात विचार येतात.त्या फाईल्स बंद करण्यासाठीच मन रुपी माकडाला पकडायला आवाज द्यायचे,कारण त्याला पकडायला काहीतरी लागते,ते असे अधांतरी राहत नाही.मनाने विविध आवाज ऐकायचे,छोटे आवाज,मोठे आवाज,जवळचे आवाज,दूरचे आवाज,चारी दिशांनी येणारे आवाज.तुम्ही कोठे आहात त्यानुसार आवाज बदलतील,दुरून वाहनांचे किंवा पक्षांचे आवाज येतील.माणसांच्या बोलण्याचे आवाज येतील.आवाज कोणते आहेत ते महत्वाचे नाही,आपले सर्व लक्ष फक्त आणि फक्त आवाजांवरच केंद्रित करणे महत्वाचे.असे करताना मध्येच मन भरकटेल,मनात विचार येऊ लागतील.ज्यावेळी हे जाणवेल कि आपले मन विचार करू लागले आहे त्यावेळी ते मान्य करायचे.चिडायचे नाही,निराश व्हायचे नाही.मन पुन्हा आवाजावर आणायचे,असे दोन मिनिटे करायचे।दोन मिनिटात कदाचित दहा वेळा मन भटकेल,नो प्रॉब्लेम.ते दहा वेळा पुनःपुन्हा आवाजावर आणायचे.येथे मनाची एकाग्रता हे ध्येय नाही,सजगता म्हणजे माझे मन विचारात भरकटले याची जाणीव होणे हे महत्वाचे आहे.तोच मेंदूतील अटेन्शन सेंटरला दिलेला व्यायाम आहे.                              

 मुलांना नेहमी लक्ष द्या असे सांगितले जाते।पण लक्ष द्यायचे म्हणजे नक्की काय करायचे हे त्यांना समजत नाही,लक्ष कसे द्यायचे हे कोठे शिकवलेही जात नाही।आपले लक्ष विचारांमुळे विचलित होत असते।या विचारात गुंतून न जाता  एकाग्रता कशी वाढवायची याचे ट्रेनिंग या मेंदूच्या व्यायामाने मिळत असते।माइंडफुलनेस वाढवण्यासाठी याचा खूप चांगला उपयोग होतो.आपण आपले मन ठरवलेल्या गोष्टीवर म्हणजे आवाजावर  पुनः पुन्हा आणतो त्यावेळी मेंदूतील अटेन्शन सेंटर काम करू लागते,आपल्या मेंदूच्या  फ्रंटल लोबमध्ये हे अटेन्शन सेंटर असते.त्याला असा व्यायाम दिल्याने ते अधिक सक्रीय होते त्यामुळे   आपला फोकस वाढू लागतो, आपण बीइंग इन द झोन राहू लागतो। बीइंग इन द झोन म्हणजे तुम्ही जे काही करीत आहात तेथेच तुमचे पूर्ण लक्ष असणे,त्यावेळी दुसरया कोणताही विचारानी विचलित न होणे होय. अभ्यासात,खेळात,नृत्यात,कलेत कोणत्याही क्षेत्रात यश मिळवायचे असेल तर हे  बीइंग इन द झोन राहण्याचे तंत्र खूप महत्वाचे आहे.विराट कोहली बँटिंग करीत असेल त्यावेळी त्याक्षणी समोर येणाऱ्या चेंडूवर त्याचे पूर्ण लक्ष असेल तर तो बीइंग इन द झोन असतो,हे लक्ष विचलित होते,त्याच्या मनात अनुष्काचे किंवा नंतर करायच्या जाहिरातीचे विचार येऊ लागतात त्यावेळी तो आउट होण्याची शक्यता वाढते.आजच्या काळात हे अटेन्शन देण्याचे स्किल वाढवणे खूप महत्वाचे आहे, कारण लक्ष विचलित करणारया असंख्य गोष्टी आजूबाजूला घडत असतात. विद्यार्थी अभ्यासाला बसतात पण फेसबुकवर नवीन पोस्ट पडली असेल असा विचार त्यांच्या मनात येतो आणि अभ्यासातील मन उडते. माइंडफुलनेसच्या अशा प्रकारच्या सरावाने मेंदूतील अटेन्शन सेंटरमध्ये नवीन पेशी निर्माण होतात असे मेंदूच्या संशोधनात दिसत आहे. त्यामुळे अटेन्शन स्पॅन वाढतो,एका कामावर अधिक काळ लक्ष केंद्रित करण्याची क्षमता वाढते. त्याचबरोबर मेंदूचा डीफॉल्ट मोड काही काळ बदलतो:त्यामुळे मेंदूचा थकवा कमी होतो.                                    

असा सराव करताना तुम्ही असे किती वेळ बसणार आहात ते प्रथम निश्चित करायचे.अर्धा मिनिट,दोन मिनिटे,पाच मिनिटे हा काळ कितीही असू शकतो.बसण्यापूर्वी आपण किती वेळ बसणार आहोत ते ठरवून तसा संकल्प करायचा।मी पाच मिनिटे बसणार असे निश्चित करायचे। सुरुवात केल्यावर कदाचित एक दोन मिनिटात कंटाळा येऊ लागतो,बस झाले,उठावे असे वाटू लागते।असे वाटू लागले तरी उठायचे नाही,त्यासाठीच संकल्प करणे महत्वाचे।संकल्प म्हणजे बुद्धी ने केलेला निश्चय,तो पाळायचा।कारण विकल्प येणे हा मनाचा स्वभाव आहे।

       संकल्पविकल्पात्मक मनः।निश्चयात्मक बुद्धी।                                                           

अशी मन आणि बुद्धीची व्याख्या योगशास्त्राने केलेली आहे.करावे,करू नये असे उलटसुलट विचार म्हणजेच संकल्प विकल्प येणे हा मनाचा नैसर्गिक गुण आहे.म्हणूनच मनाला माकडाची उपमा देतात.या माकडाला शांत करायचे असेल तर विवेक बुद्धी विकसित करायला हवी.निर्णय घेते आणि निश्चय करते ती बुद्धी,तेच मेंदूतील प्री फ्रंटल काॅर्टेक्स चे एक महत्वाचे काम आहे.

ही विवेक बुद्धी विकसित करण्यासाठी,मनाच्या लहरी साक्षीभावा ने पाहणे हे माइंडफुलनेसचे एक ध्येय आहे.आता उठुया असा विचार मनात आला तरी उठायचे नाही,पाच मिनिटे पूर्ण करायची.असे केल्याने आपण विल पॉवर,आपल्या मनाची शक्ती वाढवत असतो.

असा मेंदूचा व्यायाम नियमितपणे केल्याने मेंदूतील अटेन्शन सेंटर सक्रिय होतेच पण लर्निंग आणि मेमरीची केंद्रे ही विकसित होतात त्यामुळे मोठ्या माणसांनी हा व्यायाम करायला हवाच पण त्याची शिकवण विद्यार्थ्यांना आवर्जून द्यायला हवी.

 

Back