काम करताना सजगता

       आपले मन नेहमी विचारात मग्न असते.त्यातील बरेचसे विचार हे भूतकाळातील आठवणी आणि भविष्याची स्वप्ने किंवा  चिंता या प्रकाराचेच असतात. माणसाचा मेंदू उत्क्रांत झाला आहे तोच भूतकाळातून शिकत भविष्याचा विचार करण्यासाठी .त्यामुळेच तो बरीचशी शारीरिक कामे त्याच्या लोवर सेन्टर्सना डेलीगेट करतो,हस्तांतरित करतो.त्यामुळेच सायकल चालवायला शिकत असताना ती जाणीवपूर्वक चालवावी लागते,त्यावेळी मेंदूची उच्च केंद्रे त्यामध्ये काम करीत असतात.पण एकदा सायकल चालवणे सवयीचे झाले कि मेंदूची उच्च केंद्रे सायकल चालवण्याचे काम मेंदूतील अन्य भागांकडे सोपवतात.आणि ती त्यांचे विचार करण्याचे महत्वाचे काम करू लागतात.त्यावेळी अन्य केंद्रे सायकल चालवतात.त्यामुळे सायकल चालत असते,तुम्ही वळणे घेत असता,पेडल मारत असता आणि त्याचवेळी मेंदूत विचारही चालू असतात.                                              माणसाचे वैशिष्ट्य तो विचार करतो हेच आहे।इतर कोणताही प्राणी विचार करून भविष्याची तजवीज करीत नाही।कोणत्याही कुत्र्याला तुम्ही दोन भाकऱ्या दिल्यात तर एक भाकरी रात्रीसाठी म्हणून तो ठेवत नाही।भूक असेल तर दोन्ही भाकऱ्या खाऊन टाकतो।मधमाशी मध साठवते किंवा मुंगी साखरेचा कण तिच्या बिळात घेऊन जाते,तो भविष्यासाठी उपयोगात येत असला तरी ते कार्य सहज प्रेरणेने होत असते,हा मध कशासाठी गोळा करतो आहोत याचे भान मधमाशीला नसते.त्यामुळेच मधमाशांची अंडी नष्ट केली तरी देखील ती त्यांच्यासाठी लागणारा मध गोळा करीत राहतेच. माणसाला मात्र हे भान असते म्हणून तो काही उद्देशाने बचत करतो, भविष्याचे नियोजन करतो,ते केलेच पाहिजे.त्यासाठी खास वेळ दिला पाहिजे. असा वेळ काढून त्यावेळी भविष्यातील सर्व शक्यता लक्षात घ्यायला हव्यात ,आपल्याला नक्की काय मिळवायचे आहे,काय साधायचे आहे,कोणत्या दिशेने जायचे आहे ते ठरवायला हवे.आपल्या प्रायोरिटीज नक्की करायला हव्यात. हे देखील मानवी मेंदूतील प्रिफ्रंटल कोरटेक्स चे काम आहे.

विचार करायला हवाच पण आजच्या माणसाचा प्रॉब्लेम हा आहे की तो सततच विचार करीत राहतो किंवा विचार त्याच्या मनात सतत येत असतात. त्यामुळे तो वर्तमानाचा आनंद घेऊ शकत नाही. तो आंघोळ करताना नंतर काय करायचे याचा विचार करीत असतो,त्यामुळे त्याला आंघोळीचा आनंद मिळत नाही,तो जेवताना,समोरील पदार्थ चाखत असतानाच त्याची दुसऱ्या पदार्थांशी तुलना करीत असतो.असे करू नका,वर्तमानाचा आनंद घ्या असा उपदेश करणारे अनेक मेसेज सध्या व्हाट्सअप्प वर वाचायला मिळतात. ते चांगले आहेत पण ते केवळ बुध्दी ला पटून फारसा फरक पडत नाही कारण त्यामुळे मेंदूचे प्रोग्रामिंग बदलत नाही. ते बदलण्याची गरज असते.माइंडफुलनेस नेमके तेच करीत असते.                                                                सजग राहण्याचा सराव चालताना,जेवताना,आंघोळ करताना,कोणतेही काम करताना देखील करता येते. बऱ्याच वेळा आपण अॅटो पायलट मोड वर असतो,आपल्या कृती,हालचाली यांत्रिकतेने होत असतात. आपण आंघोळ करीत असतो पण मन तिथे नसते ते विचारात गुंग असते.सजगतेचा अभ्यास करायचा म्हणजे शरीराच्या सर्व  हालचाली जाणीवपूर्वक करायच्या,प्रत्येक क्षणाचा अनुभव पंच ज्ञानेंद्रियांनी  समरसून घ्यायचा.आंघोळ करताना अंगावर पाणी जाणीवपूर्वक घ्यायचे, पाण्याचा सर्वांगाला होणारा स्पर्श अनुभवायचा,साबणाचा वास अनुभवायचा,जेवताना प्रत्येक घास जाणीवपूर्वक घ्यायचा. Knowing what you are doing is mindfulness,शरीर काय करीत आहे याची मनाला जाणीव असणे म्हणजे सजगता.प्रत्येक कृतीचे अवधान ठेवणे म्हणजे सजगता.

  असे करताना देखील मनात विचार येत राहतात.पण त्याकडे दुर्लक्ष करून आपण मन पुनःपुन्हा ठरवलेल्या आलंबनावर म्हणजे आवाजावर, श्वासाच्या स्पर्शावर, श्वासामुळे होणाऱ्या हालचालीवर किंवा करीत असलेल्या कृतीवर आणतो आणि त्यामुळे मेंदूची सतत भूतकाळात किंवा भविष्यात भटकायची सवय बदलू शकतो.त्या क्षणाचा आनंद घेऊ शकतो.  माइंडफुलनेसचा उद्देश अधिकाधिक काळ अवधान राहावे हा आहे.अवधान अनाहूत विचारांमुळे जाते.अध्यात्मिक माणूस हातात जपमाळ घेऊन नामजप करीत असतो,पण थोड्याच वेळात मुखी नाम हाती माळा, मन भटकतसे दाही दिशा।अशी अवस्था होते.म्हणजेच त्याचे अवधान राहत नाही. अवधान ठेवण्यासाठी वेगळे काहीच करावे लागत नाही,अवधान सतत शक्य असते,फक्त त्याचे स्मरण होणे आवश्यक असते.ते झाले की माणूस त्याचे मन वर्तमानात आणू शकतो,तो करतो आहे ते काम जाणीव पूर्वक करू शकतो.बीइंग इन दि झोन राहू शकतो.फक्त त्यासाठी आत्ता माझे मन विचारात गुंग आहे हे जाणवायला हवे.ते जाणवले की मन पुन्हा पुन्हा वर्तमानात आणता येते. क्षणस्थ राहणे हेच अवधान,त्याक्षणी आजूबाजूला काय आहे,मनात काय आहे,हातात काय आहे, आपण काय करतो आहोत याचे भान म्हणजेच अवधान. ते राहत नाही,सतत जाते,ते आणण्यासाठी स्मरण लागते

अवधान म्हणजेच सजगता, पूर्णभान, माईंडफूलनेस.

        फार पूर्वीपासून अनेक संत,तत्त्वज्ञ यांनी हेच सांगितले आहे.हे अवधानाचे स्मरण व्हावे यासाठी अनेक उपाय त्यांनी सांगितले होते.,उपनयन संस्कारात दिले जाणारे यज्ञोपवीत  म्हणजे जानवे,बसवेश्वरांनी दिलेले शिवलिंग,वारकऱ्यांच्या गळ्यातील तुळशीची माळ,गुरू बांधत असलेला गंडा हे सर्व अवधानाचे स्मरण करून देणारे उपाय असावेत. ती वस्तू पाहिली की अवधान आणावे अशी अपेक्षा होतीआणि त्यासाठी ती गोष्ट सतत जवळ बाळगायची.पण त्या वस्तूचाच अहंकार झाला आणि अवधान विसरले गेले.

         आधुनिक काळात जे कृष्णमूर्ती, ओशो रजनीश,रमण महर्षी,निसर्गदत्त महाराज अशा अनेकांनी या अवधानाचाच उपदेश केला आहे. पण हे सर्वजण आध्यात्मिक असल्याने, आपण अवधान हे अध्यात्माशी जोडले आणि रोजच्या व्यवहारात त्याचा काही उपयोग नाही असे समजू लागलो.

      आधुनिक तंत्रज्ञान विकसित झाले आणि मेंदूतील डिफॉल्ट मोड नेटवर्क समजले.ते सतत सक्रिय राहिले तर होणारे त्रास,आजार समजू लागले.आणि असे लक्षात आले की हा मेंदूतील डिफॉल्ट मोड अवधान असते त्यावेळी बदलतो,त्यावेळी त्या भागाला थोडी विश्रांती मिळते,त्यामुळे आरोग्य चांगले राहते,ग्रहणक्षमता सुधारते.मन शांत आणि आनंदी राहू लागते.अवधान ठेवणे हे आपले आयुष्य अधिक चांगले करण्याचा मार्ग आहे.

म्हणून अवधान ठेवण्याचे प्रशिक्षण बाल्यावस्था संपली की सर्वांना द्यायला हवे.प्रत्येक तासात एक सजग श्वास हा अवधान ठेवण्याचा एक उपाय आहे,तो अंगिकारायला हवा. जानवे,शिवलिंग,माळा, गंडा ही सर्व साधने आहेत,साध्य आहे अवधान म्हणजेच माइंडफुलनेस.

 

Back