डिफॉल्ट मोड नेटवर्क

तुम्ही तुमच्या बोक्याला,कुत्र्याला किंवा बैलाला मधुमेह,हायपरटेन्शन किंवा थायरॉईडचा त्रास होतो आहे असे पाहिले आहे का? तशी शक्यता खूप कमी आहेत.माणसात मात्र हे आजार खूप वेगाने वाढत आहेत.त्याचे एक कारण आहे. आपल्या मेंदूतील एक ठराविक भाग सतत काम करीत असतो.माणूस शांत बसलेला असताना देखील हा भाग शांत होत नाही.रिकामे मन सैतानाचे घर म्हणतात,हा मेंदूचा भाग हेच ते घर आहे.हे सतत मनात येणारे विचार आपल्याला युद्धस्थितीत ठेवीत असतात.
त्यामुळेच मानसिक तणाव वाढतो आणि वरील सर्व आजार होतात.अन्य प्राण्यांच्या मेंदूत असे विचार येत नाहीत त्यामुळे त्यांना वरील आजार फार क्वचित होतात. आपण शांत बसलेले असताना देखील मेंदूतील जो भाग काम करीत असतो त्याला शास्त्रज्ञांनी डिफॉल्ट मोड नेटवर्क असे नाव दिले आहे. तुम्हाला कॉम्प्युटर किंवा स्मार्ट फोन मध्ये डिफॉल्ट मोड असतो हे माहित असेल. कॉम्प्युटर सुरु केला कि याच मोड मध्ये तो सुरु होतो.माणसाचा मेंदू हा सुपर कॉम्प्युटर आहे. त्यामध्येही ठराविक भाग असा असतो जो आपण गाढ झोपेतून जागे झाल्याक्षणी काम सुरु करतो.या डिफॉल्ट मोड बद्दल मेंदूच्या नवीन संशोधनात बरीच माहिती समजत आहे.
माणूस वेगवेगळ्या कृती करीत असताना मेंदूतील कोणते भाग सक्रीय होतात याचे संशोधन केले जाते.त्यावेळी कंट्रोल ग्रुप म्हणून काही माणसे संशोधनात सहभागी करावी लागतात. कोणतीही कृती न करता शांत बसलेली माणसे कंट्रोल ग्रुप मध्ये असतात.त्यांची तपासणी केली असता मेंदूतील ठराविक भाग या शांत बसलेल्या माणसांमध्ये सक्रीय असतो असे दिसू लागले. डिफॉल्ट मोड नेटवर्क हा शब्द २००१ साली प्रथम वाशिंग्टन विद्यापीठातील डॉ मार्कस राय्चल (Dr Markas Raichule) यांनी वापरला. माणूस कोणतीही कृती करीत नसताना,विचारात मग्न असताना मेंदूतील हा भाग सक्रीय असतो,पण तो एखादी कृती लक्षपूर्वक करू लागला कि ह्या भागातील सक्रियता कमी होते असे त्यांनीच दाखवून दिले.
आपण कोणतेही शारीरिक काम करीत नसतो किंवा एखादे काम यांत्रिकतेने करीत असतो त्यावेळी मेंदू विचारांच्या आवर्तात बुडालेला असतो. एका विचारातून दुसरा विचार अशी हि साखळी चालू राहते,शरीर स्थिर असले तरी मन इतस्ततः भटकत असते.आपला मेंदू भूतकाळातील आठवणीत किंवा दिवास्वप्ने पाहण्यात गुंतलेला असतो. त्यासाठीच मेंदूत उर्जा वापरली जात असते. विचार करणे हेच माणसाच्या मेंदूचे महत्वाचे काम आहे.पण ते काम सतत होत राहिले तर मेंदू थकतो,कंटाळतो,नैराश्याचा शिकार होतो. मेंदूतील या भागाला विश्रांती कधी मिळते,माहित आहे ?माणूस एखादी शारीर कृती लक्ष देऊन करू लागतो किंवा तो शरीराने काम करीत नसला तरी माइंडफुल असतो,सजग असतो त्यावेळी मात्र हा भाग शांत होतो आणि टास्क पॉझिटिव्ह नेटवर्क (TPN) सक्रीय होते.श्रमजीवी माणसात ज्यावेळी त्यांचे त्यांच्या कामावर पूर्ण लक्ष असते त्यावेळी डिफॉल्ट मोड नेटवर्कला थोडी विश्रांती मिळते. कुंभार त्याचे मडके तयार करीत असतो त्यावेळी त्याच्या मेंदूतील हा मोड बदलला जात असतो.कारण मडके करण्याच्या कृतीवर त्याला एकाग्र व्हावे लागते.
बुद्धीजीवी माणसात मात्र असे होत नाही,शिकवताना,हिशेब करीत असताना किंवा कॉम्प्युटरवर काम करीत असताना मेंदूत विचार असतातच. किंवा तुम्ही मिक्सरमध्ये चटणी वाटत असता त्यावेळी मेंदूतील विचार चालूच राहतात आणि डिफॉल्ट मोड काम करीतच राहतो.मग त्याला विश्रांती कशी मिळेल? त्याला विश्रांती देण्यासाठी सर्व बुद्धीजीवी माणसांनी माइंडफुल राहण्याचा सराव करायला हवा.सजगतेने आपण ज्यावेळी श्वासामुळे होणारी छाती किंवा पोटाची हालचाल जाणतो किंवा त्याक्षणी येणारया बाह्य आवाजावर लक्ष केंद्रित करतो त्यावेळी डिफॉल्ट मोड शांत होतो.
माणूस श्वासाचा स्पर्श जाणू लागतो त्यावेळी त्याच्या मेंदूतील टास्क पॉझिटिव्ह नेटवर्क काम करू लागते.आपल्या मेंदूच्या लँटरल प्री फ्रन्टल कॉरटेकस मध्ये लक्ष केंद्रित करणारे केंद्र असते,ते यामुळे सक्रीय होते.तुम्ही श्वासामुळे होणारी छातीची किंवा पोटाची हालचाल जाणत असता त्यावेळी मेंदूतील इंसुला नावाचा भाग सक्रीय होतो आणि डिफॉल्ट मोड शांत होतो.
Back